बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना योग-प्राणायामाचे धडे
मोबाईलच्या व्यसनातून मुक्तता आणि मन:शांतीसाठी योग आवश्यक -स्वामी शिवतेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) मध्ये बालदिनानिमित्त “उत्कर्ष योग शिबिर” मोठ्या उत्साहात पार पडले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आयोजित या विशेष शिबिरात विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे धडे देण्यात आले. या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जे.एस.एस. गुरुकुलच्या अरणगाव रोड, रानवारा येथील नवीन वास्तूमध्ये झालेल्या शिबिरात बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी शिवतेज यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांचे सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून सुदर्शन प्रक्रिया देखील करवून घेतली.
स्वामी शिवतेज म्हणाले की, आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी योग आणि ध्यान यांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मन:शांती तर मिळतेच, पण शिक्षणात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. जे.एस.एस. गुरुकुलसारख्या शाळांमध्ये अशा संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे द्योतक असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत मानसिक व आध्यात्मिक वाढ देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून उत्कर्ष योग शिबिर आयोजित करण्यात आले. शाळेत प्रत्येक सकाळी प्रार्थनेपूर्वी विद्यार्थ्यांना काही मिनिटे ध्यान व योग करण्याची सवय लावण्यात आली आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनात एकाग्रता, शांतता आणि संस्कार यांचा विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्या निकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. बालदिनानिमित्त पार पडलेल्या या उपक्रमामुळे जे.एस.एस. गुरुकुलचा परिसर योगमय आणि ऊर्जामय झाला होता. विद्यार्थ्यांनी “योग केल्यावर मन शांत होते, अभ्यासात लक्ष अधिक केंद्रित होते” अशा प्रतिक्रिया दिल्या.
