रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी निर्माण केले -ॲड. महेश शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्याकडे संघटन कौशल्य, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, महिलांना सन्मान, बुद्धीचातुर्य, युद्धपारंगत असे अष्टपैलू गुण होते. रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने महाराजांनी निर्माण केल्याचे प्रतिपादन आपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. महेश शिंदे यांनी केले.
आम आदमी पार्टीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. शिंदे बोलत होते. याप्रसंगी आपचे जिल्हा सचिव प्रा. अशोक डोंगरे, महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, नामदेव ढाकणे, सचिन एकाडे, विनोद साळवे, विजय बोरसे, काकासाहेब खेसे, विक्रम क्षीरसागर, दिलीप घुले, रजनी ताठे, साक्षी जाधव, रावसाहेब काळे, भरत खाकाळ आदी उपस्थित होते.
जिल्हा सचिव अशोक डोंगरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी धाडसी असे रयतेचे राजे होते. त्यांनी पराक्रमाने अशक्य असे स्वराज्याचे स्वप्न साकारले. महाराजांना बालवयातच राजमाता जिजाऊंनी चांगले संस्कार व शिकवण देऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली होती.
महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही, ते सर्वांना समान न्याय, सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या प्रमाणे वागले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजात कार्य करण्याचे त्यांनी सांगितले.