उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2023-24 अंतर्गत गणस्तरीय ग्रामपंचायत सदस्य व ग्राम संसाधन गट सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्य, फॅसिलिटेटर यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. चास (ता. नगर) ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यशाळेत 2024-25 आराखड्यासंदर्भात माहिती देऊन बचत गट, लहान-मोठे उद्योग व्यवसाय व आयुष्यमान भारत योजनेची माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेत आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य कार्याबद्दल निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निर्मला साठे, सोनेवाडीचे सरपंच विठ्ठल दळवी, चासचे सरपंच युवराज कार्ले, भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर, राजेंद्र खडके, मुख्याध्यापिका जयश्री निमसे, मार्गदर्शक संध्या अंबिलवादे, बबन बनकर, भाऊसाहेब नगरे, बाबा टाकले, ग्रामविकास अधिकारी रामभाऊ आबुज, कृषी सहाय्यक गोसावी मॅडम, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, मुख्याध्यापक हबीब शेख, राजेंद्र गावखरे, प्रकाश कार्ले आदी उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तर निराधार महिलांसाठी पेन्शन योजना व संद्रीय शेतीची माहिती देण्यात आली. तसेच गावाच्या विकासात्मक दृष्टीकोनाने विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.