40 वर्षांपासून संस्थेचा योग-निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार
निरोगी व आनंदी जीवनासाठी नॅचरोपॅथी जीवनशैली अवलंबा – डॉ. ऐश्वर्या शहा-देवी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्थेच्या वतीने आयोजित डिप्लोमा इन योगा इन नॅचरोपॅथी प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षणामध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या युवक-युवती व महिलांना प्रमाणपत्र वितरण करुन गौरविण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक शीतल मोहन मुगडे आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या श्वेता मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. हेमांगिनी पोतनीस, संचालिका हेमा सेलोत, तसेच तनपुरे सर, दिपीका कराचीवाला, साक्षी मेहतानी, रुतुजा गिते, दिप्ती गांधी, ऐश्वर्या देवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे येथील वैशाली नाईक यांनी उपस्थितांना आनंदी व निरोगी जीवनासाठी योग, निसर्गोपचार आणि ध्यान या विषयावर मार्गदर्शन केले. आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्था मागील 40 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून, योग-निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. डिप्लोमा इन योगा इन नॅचरोपॅथी या अभ्यासक्रमाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे.
डॉ. ऐश्वर्या शहा-देवी म्हणाल्या की, निरोगी व आनंदी जीवनासाठी नॅचरोपॅथी जीवनशैली अवलंबणे अत्यावश्यक आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक उत्पादने वापरणे महत्त्वाचे आहे. निसर्गोपचारातून महिलांना रोजगार निर्मिती पण होत आहे. गेल्या 12 वर्षापासून सौंदर्य प्रसाधनांचे नॅचरल उत्पादने तयार केले जात असून, त्याला महिला वर्गाची चांगली मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. हेमांगिनी पोतनीस यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करत असताना देखील आम्ही समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी नॅचरोपॅथीचा प्रसार 40 वर्षांपासून करत आहोत. संस्थेतून विविध कोर्सेसद्वारे शास्त्रोक्त धडे दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेमा सेलोत यांनी सांगितले की, नॅचरोपॅथीद्वारे सहजपणे कुटुंबाचे आरोग्य सांभाळले जाऊ शकते. संस्थेतून शिकलेले प्रशिक्षणार्थी आपापल्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्याबरोबरच समाजातही आरोग्यजागृती निर्माण करत आहेत. तसेच योग-निसर्गोपचाराच्या धड्यांमुळे अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाल्या.