आरक्षणासाठी शासन निर्णय काढल्याने पेढे वाटून आनंदोत्सव
मराठा समाजाच्या संघर्षाचा विजय -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे चार दिवस चाललेले उपोषण यशस्वी झाले. राज्य सरकारने मागण्यांना मान्यता देऊन जीआर काढल्यानंतर संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला.
फटाक्यांची आतषबाजीत एकमेकांना पेढे भरवून एक मराठा लाख मराठा! च्या घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला. या आनंदोत्सवात केवळ मराठा समाजच नव्हे तर इतर समाजबांधव देखील सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, गोकुळ जाधव, भाऊसाहेब जाधव, नवनाथ जाधव, वैभव पवार, मयूर काळे, किरण ठाणगे, बापू शिंदे, पप्पू भुसारे, संदीप डोंगरे, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव, बाळू फलके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून समाजाच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे. सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेत जीआर काढला ही ऐतिहासिक घटना आहे. हा विजय केवळ मराठा समाजाचा नसून, संपूर्ण मराठा समाजातील शेतकरी, ग्रामीण व सामान्य जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आरक्षण मिळाले म्हणजेच संघर्ष संपला असे नाही, तर आता शिक्षण, रोजगार, स्वावलंबन यासाठी आपण एकत्रितपणे काम करायला हवे. तरुण पिढीने या आरक्षणाचा उपयोग करून समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.