• Thu. Jul 31st, 2025

सेवाप्रीतचा स्नेह मेळावा अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह साजरा

ByMirror

Jun 19, 2024

सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित भारावले

इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा सेवाप्रीतचा प्रयत्न -जागृती ओबेरॉय

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान देणाऱ्या व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा स्नेह मेळावा स्नेहालय संचलित अनामप्रेमच्या अंध विद्यार्थ्यांसह पार पडला. या कार्यक्रमात विविध सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिला लिडर व सदस्यांना सन्मानित करण्यात आले.


अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने व अनिता माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, डॉ. सिमरन वधवा, स्विटी पंजाबी, अन्नू थापर, रितू वधवा, गितांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड आदींसह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सर्व महिलांच्या एकत्रित सामाजिक योगदानाने सेवाप्रीत चालत आहे. परमेश्‍वर कोणाला कोणत्या रूपात केव्हा मिळेल? हे माहित नाही. पण प्रत्येक व्यक्तीत परमेश्‍वराचे रूप असून त्या परमेश्‍वराची सेवा सेवाप्रीत करत आहे. दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे सेवाप्रीतच्या सदस्या स्वतःच्या प्रकाशाने इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगले कर्म करण्याची ईश्‍वराने जणू एक संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन मुलांचे भविष्य सुधारून समाज घडविण्याचे कार्य सेवाप्रीतच्या महिला तन-मन धनाने करत असल्याचे त्यांनी सांगितले.


अनिता माने म्हणाल्या की, गरजू घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उभे करण्याचे अनामप्रेम प्रमाणेच सेवाप्रीत कार्य करत आहे. सेवाप्रीतच्या माध्यमातून सर्व घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली सामाजिक चळवळ दिशादर्शक आहे. अनामप्रेम दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनात उभे करण्याचे काम करत आहे. या मुलांना स्पर्धेत टिकण्यासाठी अद्यावत शिक्षण व विविध प्रकारचे कौशल्यक्षम प्रशिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे कार्य केले जात आहे. दिव्यांगांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण व व्यवसाय आणि नोकरीच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करुन लग्न लावून देण्याचे कामही केले जात असल्याचे स्पष्ट करुन अनामप्रेम प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली.


गणेश वंदनाने कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. अनामप्रेमच्या आर्केस्ट्रा मधील कलाकारांनी विविध सुमधुर गीतांचा नजराणा पेश केला. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात अंध विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली. अंध विद्यार्थी स्मार्टफोनद्वारे वापरत असलेले सोशल मीडिया, इंटरनेट तर राहुल पेटारे या दिव्यांग विद्यार्थ्याने 13 वर्षाच्या सरावाने एका हाताने टाळी वाजवणे, तबला, ढोलकीचा आवाज काढण्याच्या कलांच्या सादरीकरणाने उपस्थितांना अवाक केले.


सेवाप्रीतच्या वतीने अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेन ड्राईव्हची भेट देण्यात आली. तर अर्चना पुगलिया यांनी अनामप्रेमसाठी 25 हजार रुपयाचा धनादेश दिला. दिव्यांगांना प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे माने दांम्पत्यांचा सेवाप्रीतच्या वतीने सन्मान करण्यात आला. महिलांसाठी यावेळी प्रश्‍नमंजुषा, बौध्दिक व मनोरंजनात्मक स्पर्धा पार पडल्या. यामधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमास उपस्थित महिलांना रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या वतीने रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिमरन वधवा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *