• Wed. Oct 29th, 2025

सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा

ByMirror

May 28, 2024

भक्तीगीत, कविता, शायरी व मुशायराची रंगली जुगलबंदी

शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ -सिध्दाराम सालीमठ

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534 वा स्थापना दिवस मंगळवारी (28 मे) उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आली. मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रारंभी भक्तीगीत, कविता, देशभक्तीवरील गीत, शायरी व मुशायराने बागरोजा येथे मैफल रंगली होती. उबेद शेख यांनी भजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रारंभ केले. राष्ट्रीय किर्तीच्या शायरा कमर सुरुर यांनी दिलो पे हुकुमत चांदबिबी की… या काव्याने सुलताना चांदबिबीचे शौर्याची माहिती दिली. तर शायरा नफीस हया यांनी आओ ऐसा हिंदुस्तान बनाये, जहा प्यार का हो कानून हो सबका सन्मान… हे गीत सादर केले. उपस्थितांनी पूर्व दिशेला गुलाल उधळून…, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे…, ए मेरे वतन के लोगो…, देश की पहेचान तिरंगा…, उघड दार देवा आता… या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला. एक लम्हा समझकर यू भूल जाना ना मुझे… सदिया जुडी हुई हे मेरे दास्तान से! ही शायरी अहमद बादशाह यांच्यावर सादर करण्यात आली. शायरी, भक्तीगीत, कविता व मुशायराच्या जुगलबंदीचा आनंद उपस्थित नगरकारांनी लुटला.


कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरुंनी शहराच्या सुख, समृध्दी व एकात्मतेसाठी प्रार्थना केली. पाहुण्यांचे स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांनी केले. यावेळी उबेद शेख, संध्या मेढे, वहाब सय्यद, युनुसभाई तांबटकर, हरजितसिंह वधवा, पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, सोमनाथ जंगम देवा, शिरीश कुलकर्णी, स्नेहालयाचे हनिफ शेख, अन्सार सय्यद, आबिद दुल्हेखान, महेश कांबळे, अरुण खिची, आफताब शेख, सलिम यावर, मुफ्ती अल्ताफ, जुनेद शेख, डॉ. भास्कर रणनवरे, विक्रम क्षीरसागर, इस्माईल शेख पापामियॉ, इंजि. संजय शिंदे, भैय्या वॉचमेकर, हाजी आरिफ, नविद शेख, रवी सातपुते, रमीज शेख, फैय्याज शेख, अदनान शेख, हामजा शेख, जावेद सय्यद, कराटे प्रशिक्षक वसिम सय्यद, युसूफ सय्यद आदींसह पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, अहमदनगर शहराला दिर्घ इतिहास आहे. शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ, सर्व जाती-धर्माच्या लोकांनी शहराच्या विकासाला चालना द्यावी. शहराच्या इतिहासातील गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमात अहमद निजामशहाने 18 मे 1490 साली केलेली शहराची स्थापना व निजामशाहीच्या वैभवशाली इतिहासावर उजाळा टाकण्यात आला. आभार आफताब शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *