भावांनी दिला निराधार बहिणींना रक्षणाचा आधार
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार पिडीत माता-भगिनी व निराधार बांधवांसह रक्षाबंधन साजरा केला. अनाथ निराधार व मानसिक विकलांग माता-भगिंनीनी निराधार बाधवांच्या मनगटावर राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा जिव्हाळा व्यक्त केला. या कार्यक्रमातून वंचितांच्या चेहऱ्यावर प्रेम व समाधानाचे हास्य फुलले होते.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या संकल्पनेतून मानवसेवा प्रकल्पात हा उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा प्रकल्पातील अनाथ निराधार बांधवांनी हातातील राखीला साक्षी मानून प्रकल्पातील आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन दिले. यावेळी मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक मथुरा जाधव, प्रशांत जाधव, ऋतिक बर्डे, पुजा मुठे, स्वप्नील मधे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ आदी उपस्थित होते.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात रस्त्यावरील बेघर, निराधार पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी अरणगाव (मेहराबाद) येथे कार्यरत आहे. सध्या 96 लाभार्थी मानवसेवा प्रकल्पात उपचार घेत असून, मानवसेवा प्रकल्पातील माता-भगिंनीनी विधिवत औक्षण करून, प्रकल्पातील बांधवांना राख्या बांधून मिठाई भरवली. प्रकल्पातील स्वयंसेवकांनी लाभार्थींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला.
प्रकल्पाचे समन्वयक मंगेश थोरात म्हणाले की, वंचितांना फक्त आधार न देता, त्यांना कुटुंबाप्रमाणे प्रेम व आपुलकी निर्माण करण्याचे कार्य मानवसेवा प्रकल्पात होत आहे. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आहे. राखी बांधण्याच्या या सणातून बहिण भावाचे स्नेह वृध्दींगत होत असते. निराधारांच्या जीवनात प्रेम व आपुलकी निर्माण करण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
