आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप
महाराष्ट्रात अन्याय, अत्याचाराने परिसीमा गाठली -सुनील ओहोळ
नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी दिवस साजरा करण्यात आला. शहरालगत असलेल्या नगर-कल्याण रोड वरील आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून या उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, विधानसभा प्रभारी गणेश बागल, सलीम अत्तर, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, नगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, कचरू लष्करे, दत्तू गिरी, रामा लष्करे, संतोष मोरे, मनीषा जाधव, अजीत यादव आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सुनील ओहोळ म्हणाले की, बहुजन समाज पार्टी उपेक्षित वर्गाचे नेतृत्व करत असून, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचे काम करत आहे. देशासह महाराष्ट्रात अन्याय, अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. धार्मिक तेढ निर्माण करुन संविधान धोक्यात आणण्याचे काम सत्ताधारी करत आहे. यासाठी नागरिकांनी जागरूक होऊन लोकशाही टिकवण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उमाशंकर यादव यांनी समाजातील घटक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी बसपाच्या माध्यमातून त्यांच्या समेवत उपक्रम घेण्यात आला. परिस्थितीवर मात करुन शिक्षणाने दिव्यांग विद्यार्थी भवितव्य घडवत आहे. त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू शिंदे यांनी पक्षाचे ध्येय धोरण स्पष्ट करुन, जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत होत आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेने व बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केक कापून त्यांना अल्पोपहाराचे वाटप केले. तर त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.