सरस्वती मंदिर नाईट स्कूलचा उपक्रम
शिक्षणा पुरते मर्यादीत न राहता, कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मार्गदर्शन -पांडुरंग गवळी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल मधील दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल आणि करिअर मार्गदर्शनावर व्याख्यान देण्यात आले. दिवसा काम आणि रात्री नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल माहिती देण्यात आली.
नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची संधी नाईट स्कूलमुळे प्राप्त झाली. तर शिक्षण घेताना जीवनातील ध्येय प्राप्तीची दिशा मिळाली. मासूम संस्थेच्या वर्षभर विविध योजनांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य लाभले. बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना मासूम संस्थेच्या वतीने दर रविवारी घेण्यात येणाऱ्या अधिक तासामुळे परीक्षेला उत्तमप्रकारे सामोरे जाता आल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या वतीने मासूम संस्थेच्या सीईओ निकिता केतकर, एसएससी विभागाचे गवस सर, गुरुप्रसाद पाटील, निलेश ठोंबरे यांचे विशेष आभार मानले.

यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी समाजात अपूर्ण शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरस्वती मंदिर नाईट स्कूल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. फक्त शिक्षणा पुरते मर्यादीत न राहता, कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्याथ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा नाईट स्कूलच्या माध्यमातून प्रवेशित होण्याचे आवाहन केले.
दहावीचे वर्ग शिक्षक देवका लबडे यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन करुन भविष्यातील उपलब्ध संधीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणा कुराडे यांनी केले. आभार विलास शिंदे यांनी मानले. शाळेच्या मा.वि. संघाचे अध्यक्ष स्वप्निल वाघ यांनी शाळेमध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करण्याबाबत सुचविले. संस्थेचे पदाधिकारी डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. निलेश वैकर, डॉ. अनिरुद्ध गीते, मंगेश धर्माधिकारी आदी विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.