जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना पुणे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (दि.21 ऑक्टोबर) पुणे विभागात घेतल्या जाणार आहे. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी पुणे इंटरनॅशनल कॉलेज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी केले आहे.
बहुजन समाज पार्टीने स्वबळाचा नारा देऊन महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. सर्व विधानसभा मतदार संघात उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु असून, या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत होणार आहे. बसपाचे प्रदेश प्रभारी इंजी.रामजी गौतम, नर्मदाप्रसाद अहिरवार, प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव हुलगेस चलवादी, प्रदेश कार्यकारणी सदस्य रामचंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे.
या मुलाखतीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.
