शासकीय जमिनीवर अतिक्रमणे नियमाकुल करण्याची मागणी
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही दलित-आदिवासी समाज भूमिहीन असल्याचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भूमिहीन समाजाला उपजीविकेचे साधन म्हणून शासनाने विनामोबदला जमीन वाटप करावी, तसेच जे भूमिहीन कुटुंब शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आहेत, त्या जमिनी त्यांच्या नावावर कायमस्वरूपी करून द्याव्यात, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, महासचिव राजू शिंदे, सलीम अत्तार, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाले, उमाशंकर यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटूनही दलित-आदिवासी समाजातील मोठा वर्ग अजूनही भूमिहीन आहे. या समाजाने हजारो वर्षे समाजातील कठीण, अशुद्ध व कष्टाची कामे पार पाडलीडोक्यावर मैला वाहून नेणे, मेलेली जनावरे उचलणे, शेतीची अवजारे तयार करणे, सफाईकामे करणे अशा समाजसेवेच्या माध्यमातून जगणारा हा वर्ग आजही उपेक्षित आहे.
आजही ऊसतोड कामगारांपैकी 90 ते 95 टक्के कामगार दलित-आदिवासी समाजातील असून त्यांचे आर्थिक शोषण सुरूच असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी जिथे घरे उभी केली आहेत ती घरे किंवा जमिनी त्यांच्या नावावर होत नाहीत. अनेक ठिकाणी या समाजाला दफनभूमीच उपलब्ध करून दिलेली नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे शासनाने मागे घेतले, त्याच धर्तीवर भीमा कोरेगाव दंगलीनंतर शांततेने निदर्शन करणाऱ्या समाजबांधवांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. आदिवासी समाज पारंपरिकरित्या मासेमारी करून उपजीविका करत आला आहे. तरीदेखील सरकारी जलाशयातील मासेमारीचे ठेके प्रभावशाली धनदांडग्यांना देण्यात येतात. शासनाने हे ठेके थेट आदिवासी समाजाला दिल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल, असेही बसपाच्या निवेदनात म्हटले आहे.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करून भूमिहीनांच्या नावावर करावीत, भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी प्रत्येकी मोफत पाच एकर जमीन द्यावी, भीमा कोरेगाव दंगलीनंतर आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत व सरकारी जलाशयातील मासेमारीचे ठेके आदिवासी समाजाला देण्याची मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.