• Mon. Jan 12th, 2026

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिमुकल्यांनी भरवला बिझ बाजार

ByMirror

Sep 21, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढवण्यासाठी व पैशाची देवाण-घेवाण कशी करावी? व्यवहार कसे करावे? यासाठी बिझ बाजार भरविण्यात आला.


या बिझ बाजारला अनेक पालकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने भेट दिली. या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बाजार भरविण्यात आला होता. मंजुषा आर्ट, गौड आर्ट, ओरिगामी अशा विविध कलांच्या माध्यमातून मुलांनी विविध वस्तू तयार केल्या होत्या. पेंटिंग, फ्रेम, रुमाल, तोरण, फुलदाण्या, वॉलपीस, शोपीस, विविध आकारातील हंड्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करुन बाजारात मांडल्या होत्या.


शिक्षकांनी त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले होते. या सर्व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच तर खाद्यपदार्थांची माहिती होण्याच्या दृष्टीने मुलांनी खाद्यपदार्थांचेही स्टॉल लावले होते. त्यातून बोलायचे कसे, आपापसातील व्यवहार कसे व्हावे, याविषयी मुलांना माहिती व्हावी हाच उद्देश हा बाजार भरविण्यात आला होता. यातून मुलांना विविध विषयांचे ज्ञान मिळाले.


या बिझ बाजारला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या यात्रेचे स्वरूप यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलला आले होते. पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हा बिझ बाजार उपक्रम राबवल्याबद्दल अनेक पालकांनी शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप व सर्व शिक्षकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे उदघाटन करताना शाळेचे प्राचार्य जगताप म्हणाले की, आम्ही नेहमीच मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी, मुले सर्वगुणसंपन्न होण्यासाठी प्रयत्नशील असतो.

त्या दृष्टीने हा बिझ बाजार उपक्रम राबविला. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळेलच त्या बरोबर मुलांना पैशाचे महत्त्व समजेल. या बाजाराला भेट देताना पालकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देताना शाळेचे प्राचार्य जगताप व शिक्षकांचे आभार मानले. त्याचबरोबर असे कार्यक्रम नेहमीच राबवित असल्या बद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आनंदाबरोबर त्यांचा विकास होण्यासाठी शाळा राबवत असलेल्या अशा उपक्रमांमध्ये आम्हीही सहभागी होऊ, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी प्राचार्यांना दिले. बिझ बाजार मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *