राजमाता जिजाऊंचा इतिहास म्हणजे नवयुगाच्या विचारांची मशाल -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊंचे कार्य, विचार व त्यागमय जीवनकार्याची माहिती देत त्यांच्याबद्दल अभिमान बाळगण्याची प्रेरणा देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. यावेळी तुझ्या धाडसाचे धडे आम्हाला, तुझ्या विचारांचे धडे सोबतीला! गाजवू शौर्य आम्ही, जिजाऊ माऊली गे… या जाज्वल्य गीत देखील सादर करण्यात आले. या भावपूर्ण गीताने उपस्थितांचे मन भारावून गेले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, अहिल्या सांगळे, योगिता वाघमारे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरिता ढवण यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंचा इतिहास म्हणजे नवयुगाच्या विचारांची मशाल आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व घडवले. आजच्या मुलामुलींना त्यांच्या विचारांचे वळण लावणे हे काळाची गरज आहे. जिजाऊ माऊलींनी दाखवलेली दिशा आपल्याला सदैव योग्य मार्ग दाखवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आवारे यांनी केले. आभार सुरेखा वाघ यांनी मानले.