उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड, भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटल आवारात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सार्वजनिक स्मारक उभारावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवकचे जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे झालेल्या भेटीत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देऊन हा मुद्दा मांडला. या वेळी आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड, भीमराव पगारे, सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने भिंगार भूमी पावन झाली आहे. येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलला आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या भावनिक आवाहनानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल असे नाव देण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि प्रतिमा असूनही त्या जागेचा परिसर अत्यंत लहान आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्रास सहन करावा लागतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
सदर हॉस्पिटल परिसरात मोठी जागा रिकामी असून, ती जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.भिंगारवासीयांचे या ठिकाणाशी भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे येथे एक प्रशस्त, आकर्षक आणि भव्य सार्वजनिक स्मारक उभारल्यास भिंगार शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा विश्वास भिंगारकरांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.