• Sat. Feb 14th, 2026

मनोज शिंदे यांना ‘शिवछत्रपती समाजरत्न’ पुरस्कार जाहीर

ByMirror

Feb 13, 2026

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-  स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बोल्हेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊसाहेब शिंदे यांना ‘शिवछत्रपती समाजरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक, धार्मिक, स्वच्छता तसेच पर्यावरण संवर्धन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार असून, त्यामध्ये मनोज शिंदे यांची ‘शिवछत्रपती समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी ही माहिती दिली.


मनोज भाऊसाहेब शिंदे हे एका खासगी कंपनीत कार्यरत असूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत आहेत. समाजप्रबोधन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.


सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देत त्यांनी स्वच्छता अभियान राबवले आहे. गावपातळीवर स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व जनजागृती मोहिमा देखील आयोजित केल्या आहेत. शिंदे हे दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देत त्यांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहेत.

गरजूंना मदत, सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारित त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांची ‘शिवछत्रपती समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *