पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार
प्रामाणिक समाजकार्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला -किशोर डागवाले
अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल माळी समाज ट्रस्टच्या शहर युवक उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भरत गारुडकर यांची नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी नियुक्तीची घोषणा करुन, नियुक्ती झाल्याबद्दल युवक अध्यक्ष मनोज गाडळकर यांनी गारुडकर यांचा सत्कार केला. यावेळी बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र पडोळे, विनोद पुंड, ॲड. राहुल रासकर, कॅप्टन सुधीर पुंड, रोहित पठारे, लवेश गोंधळे, पवन कोतकर आदी उपस्थित होते.

किशोर डागवाले म्हणाले की, सकल माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून माळी समाज एकवटत आहे. प्रामाणिक समाजकार्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. संघटना बांधणी उत्तमपणे सुरु असून, समाजात कार्यरत युवकांना विविध पदाच्या माध्यमातून जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भरत गारुडकर हे महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष असून, समाजात त्यांचे विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात ते निस्वार्थपणे कार्य करत आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. सामाजिक कार्य करताना त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शहर युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सत्काराला उत्तर देताना भरत गारुडकर म्हणाले की, राजकीय पक्षाचे जोडे बाजूला करुन सकल माळी समाज ट्रस्टमध्ये सामाजिक कार्य सुरु आहे. सर्वांना बरोबर घेऊन व एकजुटीने समाजाचा विकास साधण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. तर पदाच्या माध्यमातून समाजातील युवकांना संघटित करुन युवकांचे व समाजातील प्रश्न सोडविण्यास प्राध्यान्य देऊन कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल गारुडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
