रामवाडी मित्र मंडळाचा उपक्रम; घरोघरी भंडाऱ्याचे वाटप
बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले -आ. संग्राम जगताप
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला फाटा देवून रामवाडी परिसरातील नागरिकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडारा वाटपाचे प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. परिसरातील नागरिकांना घरोघरी या भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे निलेश म्हसे पाटील, सुरेश बनसोडे, विकी इंगळे, सागर मुर्तुडकर, प्रकाश वाघमारे, सागर साठे, रामवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश साळवे, नितीन कसबेकर, नितीन साळवे, सुरेश वैरागर, दीपक सरोदे, दीपक साबळे, अश्विन खुडे, संकेत लोखंडे, पप्पू पाथरे, गणेश ससाणे, राजू कांबळे, दीपक लोखंडे, बंटी साबळे, मयूर चखाले, अजय केंजरला आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले. त्यांचा वैचारिक वारसा समोर ठेवून रामवाडी मित्र मंडळाने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सतीश साळवे म्हणाले की, रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी बाबासाहेबांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते. इतर खर्चाला फाटा देवून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्न दानाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निलेश म्हसे यांनी रामवाडी मित्र मंडळ विविध उपक्रमाद्वारे गोरगरीब जनतेला आधार देण्याचे कार्य करत आहे. डीजेवर नाचण्यापेक्षा गरजूंच्या घरात अन्न देऊन पुण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव यांचे देखील सहकार्य लाभले.
