• Tue. Jul 22nd, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहसंमेलन

ByMirror

Feb 16, 2024

विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा अर्थार्जन करुन रात्री विद्यार्जन करणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 72 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. बिकट परिस्थितीने शालेय जीवन हिरावल्यानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळावल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी रंगलेल्या स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धमाल केली. हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता.


हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझाइनिंगच्या संचालिका रचना काकडे, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अशोक (बाबूशेठ) बोरा, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, मार्गदर्शक अजित बोरा, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, पेमराज शाळा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, मेरी इंग्लिश स्कूलचे चेअरमनजगदीश झालानी, संस्था पदाधिकारी ज्योती कुलकर्णी, शालेय समिती सदस्य संगीता ॲबट, विलास बडवे, गजेंद्र गाडगीळ, अनिरुद्ध देशमुख, शिक्षक प्रतिनिधी वृषाली साताळकर, शिक्षकेतर प्रतिनिधी अनिरुद्ध कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी जोशी, माया पाटोळे, पूनम बारगळ, दत्तात्रय गायकवाड, ऋषिकेश साठे, राजू कुलकर्णी, विजय भंडारी, संभाजी सुसरे, संगीता ॲबट, सायली खराडे, दादा चौधरीचे मुख्याध्यापक सुभाष येवले, माजी मुख्याध्यापक संजय मुदगल आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी सरस्वतीपूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. पाहुण्यांचे झांज व ढोल पथकाने स्वागत करण्यात आले. रात्र शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनी रंजना कांबळे हिने लिहिलेल्या नवनाथ गाथा ग्रंथाची पारंपारिक वाद्याच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. पाहुण्यांचे स्वागत सुनील सुसरे व गजेंद्र गाडगीळ यांनी केले.


प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी राज्यातील सर्वात मोठी नाईट स्कूल म्हणून भाई सथ्था नाईट स्कूल पुढे आली आहे. अद्यावत शिक्षण प्रणाली व तळमळीने शिकवणारे शिक्षकांच्या माध्यमातून नाईट स्कूलचे विद्यार्थी आपले भवितव्य घडवित आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मुंबई येथील मासुम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर व संस्थेचे देखील सहकार्य लाभत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करा व स्पर्धेत उतरण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


ॲड. अनंत फडणीस यांनी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे कार्य प्रकर्षाने जाणवते. रात्र शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे जात आहे. बारावीनंतरच्या शिक्षणासाठी त्यांची सोय करण्याचे आश्‍वासन दिले. अशोक (बाबूशेठ) बोरा यांनी दादा चौधरी यांनी शैक्षणिक क्रांती घडवून समाजाला विकासाची दिशा दिली. प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सर्वांना अभिमान आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील अंधारात दिव्याखाली शिक्षण घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून रात्र शाळेतील विद्यार्थी पुढे मार्गक्रमण भविष्य घडवणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.


सुमित कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी रात्र शाळा ही एक वेगळी संकल्पना शहरात कार्यरत आहे. अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनात ध्येय गाठू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, शिक्षणाच्या पंढरीत रात्र शाळेची दिंडी सर्वांचे लक्ष वेधत आहे. या शाळेत विद्यार्थिनी घडवून त्यांना जीवनात उभे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. रचना काकडे यांनी रात्र शाळेतील शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठा आदर दिसून येतो. आयुष्यात जीवनात पुढे जाण्यासाठी कृतज्ञता महत्त्वाची आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच कौशल्य विकसित करणे काळाची गरज निर्माण झाली असून, त्या दृष्टीने नाईट हायस्कूलचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले. अहवाल वाचन महादेव राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार व ओंकार भिंगारदिवे यांनी केले. आभार प्रशांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *