विद्यार्थ्यांनी कुराणच्या आयतचे पठण करून त्याच्या अर्थाचे केले उद्बोधन
मदरसेतील कराटे खेळाडूंचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात ईस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ कुराण व हदीस पठण स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये मदरसामधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी कुराण मधील आयतचे पठण करून त्याच्या अर्थाचे उद्बोधन केले. तर हदीस मधून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात आचरण करण्यास सांगितलेल्या तत्त्वांचा उपदेश स्पष्ट केला.
रविवारी (दि.10 सप्टेंबर) मदरसा मधील मशिद मध्ये ही स्पर्धा रंगली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हाजी इरफान शेख, हाजी शौकत तांबोली, हाजी उस्मान, हाजी एजाज तांबोली, हाजी इब्राहिम शेख, अमीर सय्यद, अतिक तांबोली, मदरसेचे प्रमुख (कारी) अब्दुल कादिर शेख, आयटीआयचे प्राचार्य नदिम शेख आदी उपस्थित होते.

हाजी शौकत तांबोली म्हणाले की, मदरसेमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबर शालेय व व्यावसायिक शिक्षण देवून विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडासाठी प्रोत्साहन देण्याचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. जीवनात संकटांना सामोरे गेल्याशिवाय यश मिळत नाही. परिस्थिती पाहून सक्षम होणे काळाची गरज बनली आहे. स्वसंरक्षणासाठी कराटे उपयुक्त असून, अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठवण्याचे त्यांनी सांगितले. तर जगात सर्वाधिक वाचली जाणारी व अभ्यास होणारी कुराण एकमेव पुस्तक आहे. खरा इस्लाम घरोघरी पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमीर सय्यद म्हणाले की, मुलांना स्पर्धेत टिकण्यासाठी मदरसेच्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे. मानसिक व शारीरिक विकासाने सक्षम विद्यार्थी घडणार आहे. मैदानी खेळाने शारीरिक विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हाजी इरफान शेख यांनी या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अक्कलकुवा (जि. नंदूरबार) येथे राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया कुराण व हदीस स्पर्धा होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर मदरसांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील प्रथम दोन विजेत्यांना सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यातील विजेते अक्कलकुवा येथील ऑल इंडिया स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती मदरसेचे प्रमुख अब्दुल कादिर शेख यांनी दिली.
मदरसामध्ये झालेल्या कुराण व हदीस पठण स्पर्धेत फरहान शेख,युनुस शेख, हुजेफा अन्सारी, जुनेद शेख, मुस्तकीम शेख यांनी बक्षीस पटकाविले. या पाच मधील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. तर नुकतेच सावेडी येथे अहमदनगर डिस्ट्रिक्ट रुरल कराटे असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत मदरसेमधील खेळाडू अब्दुल समद तांबोली व कैफ बिलाल यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांची बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मदरसेतील दोन विद्यार्थ्यांनी रोप्य व अकरा विद्यार्थ्यांनी कास्यपदक पटकाविले. या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांचे हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर कुराण व हदीस स्पर्धेतील विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे देण्यात आली.
