• Mon. Nov 3rd, 2025

नेप्तीत बैलपोळा सण उत्साहात साजरा

ByMirror

Sep 15, 2023
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गावात बैलांना घेऊन निघालेल्या वाद्य मिरवणुकीने चैतन्य संचारला होता. ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जपकर व जपकर कुटुंबांनी बैलांना आकर्षक सजवून शिस्तबंद मिरवणूक काढली होती. हिंदू मुस्लिम शेतकरी बांधवांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवून धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.

पिकांना मिळणारा कवडीमोल भाव, पावसाचा लहरीपणा तरीदेखील वर्षभर ऊन, वारा, पाऊस याची परर्वा न करता वर्षभर आपल्या मालकासाठी मेहनत करणाऱ्या बैलांचा मानाचा श्रवणी बैलपोळा शेतकऱ्यांनी बैलाची वाद्य मिरवणूक काढून बैलांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून बैलपोळा सण नेप्तीत उत्साहात साजरा केला.


भारतीय संस्कृतीनुसार यांत्रिकीकरणाच्या काळात पोळा सण हा ग्रामीण भागात मोठ्‌या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी आपली दावण खाली राहू नये, म्हणून शेतकरी बैल जोडया खरेदी करुन त्याची पूजा करतो. ज्यांच्याकडे बैल जोड्या नाही, त्या शेतकऱ्यांनी मातीच्या बैलाची तर काहींनी ट्रॅक्टरची पूजा केली. बैल पोळ्‌यानिमित्त गावातील शेतकरी वर्गाने बैलांना स्नान घालून, वाशिंग फुगे, मणी-माळ, रंग यांनी सजवून सवाद्य गावातून मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. बैलाच्या पाठीवर दिले जाणारे संदेश गावाला प्रेरणा देणारे होते.

हनुमान मंदिराच्या पटांगणात बैलांना आणून, बैलांना हनुमान मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. बैलाच्या आरोग्यासाठी व लंपी या आजाराच्या मुक्तीसाठी शेतकऱ्यांनी हनुमान चरणी प्रार्थना केली. त्यानंतर घरी आलेल्या बैलांची सुहासिनींनी यांनी पूजा करून बैलांना खास पुरण पोळ्याचा नैवेद्य भरविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जपकर, पुनम जपकर, संतोष जपकर, सुरेखा जपकर, आसाराम जपकर, बबई जपकर, रामदास फुले, कारभारी जपकर, मच्छिद्र जपकर, बबन गडाख, गोरख जपकर, अंकुश जपकर, नामदेव गाडगे, नवनाथ कोतकर, सोमनाथ सातपुते, अशोक जपकर, नसीर सय्यद आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *