• Thu. Oct 30th, 2025

मनपा उद्यानाची झालेली वाताहात व सुरु असलेली लूट थांबविण्यासाठी बागोड्या सत्याग्रह

ByMirror

May 8, 2024

आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास विजेच्या खांबाला डांबून केले जाणार आंदोलन

राजकीय नेत्यांच्या पंटरांना उद्यानाची खैरात व उद्यानाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहात, तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरु असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञाक चळचळीच्या माध्यमातून बागोड्या सत्याग्रह जारी करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या पंटरांना उद्यानाची खैरात करणारे व उद्यानाकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास लक्ष्मी उद्यानात विजेच्या खांबाला डांबून शनिवारी (दि.18 मे) बागोड्या सत्याग्रह केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


शहरातील सर्व सार्वजनिक उद्यानात मोठी लूट सुरु आहे. मरक्या घोड्यावर बसण्यासाठी 30 रुपये घेतले जातात. काही उद्यानात ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात खासगी झोके लावले असून, ते नागरिकांकडून अव्वाच्यासव्वा रुपये वसूल करत आहे. उद्यानात व्यवसाय करणारे खासगी पाळणे अथवा खेळणे वाल्यांना मनपाने दर निश्‍चित करुन दिल्यास सर्वसामान्यांनी लूट थांबण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.


कोणत्याही उद्यानामध्ये खेण्याची सोय नाही. अनेक खेळणे मोडकळीस आलेले असून, नागरिकांना खासगी पाळण्यांशिवाय पर्याय नाही. सर्व झाडे जळून जात असून, विशेष म्हणजे लक्ष्मी उद्यानासमोर जाणे-येण्याचा रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग केल्याने मुलांना उद्यानात जाण्यास देखील अवघड होत आहे. बागोड्या म्हणजे मुलांचा बागडण्याचा आणि आनंद लुटण्याचा अधिकार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. दिवसभर उन्हामुळे मुले घरी असतात, संध्याकाळी मुलांना खेळण्याची संधी उद्यानामध्ये मिळण्याची आवश्‍यकता आहे. मनपाच्या अनागोंदीमुळे शहरातील उद्यानाची वाताहात झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


परदेशामध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. खेळाच्या सोयी मोफत उपलब्ध केल्या जातात. परंतु भारतात लहान मुलांवर अतिशय नकारात्मक संस्कार केले जातात. मुलांना त्यांचा खेळण्याचा हक्क मिळण्यासाठी हे आंदोलन जारी करण्यात आले असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, डॉ. रमाकांत मडकर, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *