महानगरपालिका गणेशोत्सव देखावे स्पर्धा 2025
देखाव्यातून साकारला होता आधुनिक तंत्रज्ञान व सर्जनशीलतेचा अनोखा संगम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावे स्पर्धा 2025 मध्ये बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने जिवंत देखावा/सोशल मिडिया व आधुनिक तंत्रज्ञान या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मंडळाच्या वतीने महाअवतार नृसिंहस्वामी हा जिवंत देखावा साकारण्यात आला होता.
महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या समारंभात मनपा सहा. आयुक्त श्रीमती सपना वसावा यांच्या हस्ते बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान (ट्रस्ट)चे संस्थापक-अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सचिव कुणाल गोसके आणि खजिनदार वरुण मिस्कीन यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी मंडळाचे गणेश म्याना, राजु गड्डम, महेश सब्बन, जिग्नेश जग्गड, राजु पठारे, दत्ताभाऊ बेत्ती, संजय नाना कांबळे, सुमित गोसके, मयुर चिलवर, प्रथमेश संभार, रोहित म्याना, सुरज गोंधळी, संकेत जक्कल, सर्वेश सब्बन, प्रथम सिंग आदींसह शहरातील गणेशभक्त आणि विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलदारसिंग बीर म्हणाले की, दरवर्षी बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट गणेशोत्सवात धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीवर भव्य देखावे सादर करत असतो. यावर्षी महाअवतार नृसिंहस्वामी या जिवंत देखाव्याला गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्याची दखल महापालिकेने घेऊन मंडळास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिल्याचा सर्वांना आनंद होत आहे. मंडळाच्या वतीने वर्षभर धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु असतात. मंडळाच्या माध्यमातून मोठा युवा वर्ग जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेचे परीक्षण मेहेर लहारे, प्र. मुख्यलेखाधिकारी श्री.गणेश लयचेट्टी, प्रसिध्दी व संस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजन, क्रीडा विभाग प्रमुख व्हिन्सेंट फिलिप्स, परीक्षक.श्रेणिक शिंगवी, संदीप जाधव, ठाकुरदास परदेशी, तेजस अतितकर यांनी केले. या देखाव्यासाठी ऑरा डान्स ॲकॅडमीचे सागर जाधव, प्रणव लोखंडे, प्रेम उदमले, पृथ्वी धुमाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. मंडळाने या यशाबद्दल सर्व देणगीदार, भाविक भक्त, मार्गदर्शक, सभासद व मित्रपरिवाराचे आभार मानले असून, पुढील वर्षी आणखी भव्य आणि तंत्रज्ञानाधारित देखावा सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
