• Thu. Oct 30th, 2025

एसटी बसमध्ये विसरलेली पैश्‍याची बॅग नगरच्या प्रवाश्‍याला परत

ByMirror

Oct 8, 2023

चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा

तारकपूर आगारात बोलावून प्रवाश्‍याकडे केली बॅग सुपूर्द

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिरपूर-पुणे बसचे चालक व्ही.एम. राठोड व वाहक आर.ए. गवळी (शिरपूर आगार) यांनी प्रामाणिकता दाखवत पैश्‍याने भरलेली व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग अहमदनगर मधील प्रवासी शकिल खान यांना परत केली. एसटीच्या चालक-वाहकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


6 ऑक्टोबर रोजी शिरपूर-पुणे या बसमध्ये शहरातील शकिल खान (रा. मुकुंदनगर) यांनी कोल्हार ते तारकपूर असा प्रवास केला. गडबडमध्ये त्यांच्या जवळ असलेली बॅग एसटी बसमध्येच राहिली. या बॅगेत 50 हजाराची रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्रे होते. प्रवास करुन ही बस पुढे पुणे येथील शिवाजीनगर बस स्थानक येथे पोहचली. वाहकाला ही बॅग नजरेत पडल्याने, कोणत्या तरी प्रवाश्‍याची बस एसटीत राहिल्याचे लक्षात आले. चालक व वाहकांनी बॅग तपासली असता यामध्ये पैसे व कागदपत्र असल्याचे आढळले. तर बॅम्गेत एक ओळखत्र व त्यावर मोबाईल क्रमांक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला.


बॅगेचा शोध घेणारे खान यांचा फोन खणखणला, चालक व वाहकांनी फोनवर आपली बॅग व पैसे सर्व व्यवस्थित असल्याची कल्पना दिल्याने त्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. एसटीने दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करताना चालक व्ही.एम. राठोड व वाहक आर.ए. गवळी यांनी खान यांना तारकपूर आगारात बोलावून त्यांच्याकडे सदरची विसरलेली बॅग सुपूर्द केली. हा प्रामाणिकपणा पाहून खान यांच्यासह उपस्थित सर्वच भारावले. खान यांनी समाधान व्यक्त करुन एसटी महामंडळामध्ये असलेल्या प्रमाणिकपणाचे अभिनंदन केले. यावेळी वाहतूक निरीक्षक श्रीमती भांड, वाहतूक नियंत्रक एस.बी. शितोळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *