जिल्हाधिकारी यांनी दिले नियुक्तीचे आदेश
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग हक्क अधिनियम 2024 मधील तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांसाठी राज्य सल्लागार मंडळाची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकिय सदस्यपदी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सदस्य निवड बाबतचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून जिल्हा समितीच्या बैठका घेऊन दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसन व सक्षमीकरणाबाबत जिल्हा प्राधिकरणास सल्ला देणे, जिल्हा नियोजन व विकास परिषदांचे कामकाज आणि समुचित प्राधिकरणाने दिव्यांगाच्या कल्याणासाठी निर्धारित केलेल्या 5 टक्के निधीच्या खर्चावर देखरेख ठवणे व आढावा घेणे, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगासाठीच्या योजनांची, कार्यक्रमाची अंमलबजावणी करतांना जिल्हा प्राधिकारी यांना सहाय्य करणे, दिव्यांग अधिनियमातील तरतुदींची जिल्हा प्रशासनाद्धारे अंमलबजावणी न करण्याबद्दलच्या तक्रारींची दखल घेऊन संबधीत तक्रारीच्या अनुषंगाने सुयोग्य उपाययोजना करण्याबाबत संबधीत प्राधिकरणास शिफारस करणे, त्याच बरोबर अधिनियमातील कलम 23 मधील 4 अंतर्गत तक्रार निवारण अधिकाऱ्यानं केलेल्या कारवाईमुळे व्यथीत झालेल्या शासकिय आस्थापनावरील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन सुयोग्य उपाययोजनांची शिफारस करण्याबरोबरच शासनाने नेमून दिलेल्या कोणत्याही प्रकारचे कार्य समितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा आढावा घेणे, ही कामे समितीच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती बाबासाहेब महापुरे यांनी दिली.
दिव्यांग बांधवाच्या प्रत्येक समस्येवर मार्ग काढण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे महापुरे यांनी सांगीतले. जिल्हास्तर समितीच्या सदस्यपदी हक्काच्या माणसाची निवड झाल्याने दिव्यांग बांधवांनी महापुरे यांचे अभिनंदन केले आहे.