बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे खासदार विखे पाटील यांच्याकडून कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, बाबुशेठ टायरवाले आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बाबासाहेब बोडखे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर बोडखे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान दिशादर्शक असून, सामाजिक भावनेने गरजू, निराधार विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
बोडखे हे पंडित नेहरू हिंदी विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक असून, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. सलग दोन टर्म मध्ये ते माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. कोरोना काळात धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना अन्नधान्य व किराणा देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या दृष्टीने भाजीपाला व्यवसायिकांना स्वखर्चाने मास्क आणि हॅण्डग्लोव्हज पुरवले. कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या सोप्या भाषेत स्वाध्याय पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना वाटप केल्या. कोरोनात पालकत्व गमावणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवत उच्च शिक्षण होईपर्यंत निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.
गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. वंचित, मुकबधीर, मनोविकलांग, निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना सातत्याने आधार देण्याचे काम करत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ आणि सत्यजित महाराष्ट्राच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.