माध्यमिक शिक्षक सोसायटीत सलग तिसऱ्यांदा संचालकपदी विजय व शिक्षकहितासाठी झटणाऱ्या बोडखे यांचा सन्मान
शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक कार्याचे पद्मश्री पवारांकडून कौतुक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे विविध प्रश्न सातत्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांचा सलग तिसऱ्यांदा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालकपदी सर्वाधिक मताधिक्याने निवड झाल्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक महेंद्र हिंगे, प्रा. सुधाकर सुंबे, प्रा. संजय अनभुले, उद्योजक नानासाहेब भवर, श्री. काळे आदी उपस्थित होते.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटी ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खरी कामधेनू आहे. या संस्थेतून शिक्षकांच्या हक्कासाठी, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्य केले जात आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेला विजय हा त्यांच्या कार्याची पावती आहे. ते शिक्षक असूनही समाजकारणातही सक्रीय आहेत दिव्यांग, गरजू आणि दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्य करतात. अशा सेवाभावी नेतृत्वाची समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर बोडखे यांचे पर्यावरण संवर्धनसाठी सुरु असलेल्या वृक्षारोपण व संवर्धनाच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
बाबासाहेब बोडखे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सेवाभाव हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समाज यांच्यासाठी कार्य करत राहणार आहे. शिक्षकांचे प्रश्न मांडणे, ते सोडविणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे या ध्येयाने काम सुरु असून, शिक्षकांनी टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
