• Wed. Oct 15th, 2025

लिनेसच्या स्नेह मेळाव्यात महिलांच्या सामाजिक कार्याचा जागर

ByMirror

Aug 9, 2024

उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या महिला सदस्यांचा सन्मान

महिलांनी एकत्र येऊन लिनेसच्या माध्यमातून सेवाकार्याची ज्योत प्रज्वलीत केली -लतिका पवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यासाठी विविध क्षेत्रातील एकत्र आलेल्या महिलांच्या ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत एमएच 3 गोदातरंग मधील सर्व लिनेसच्या नंदिका लिनेसचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. सामाजिक कार्याचा जागर करुन निस्वार्थपणे उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या क्लबच्या महिला सदस्यांना सन्मानित करण्यात आले.


हॉटेल संजोग लॉन्स येथे सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मल्टीपल अध्यक्षा कुमकुमजी वर्मा, कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनीताई कोयटे, गोदातरंगच्या प्रांताध्यक्षा लतिकाताई पवार, डॉ. वर्षाताई झंवर, अंजलीताई विसपुते, छायाताई रजपूत, रजनीताई गोंदकर, नीलिमा मंत्री उपस्थित होत्या.
मराठमोळी संस्कृती जपत पाहुण्यांचा पारंपारिक वाद्यांसह लेझीम पथकाच्या निनादात औक्षण करुन स्वागत करण्यात आले. ध्वजवंदनेने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली.


प्रास्ताविकात गोदातरंगच्या प्रांताध्यक्षा लतिकाताई पवार म्हणाल्या की, सर्व महिलांनी एकत्र येऊन लिनेसच्या माध्यमातून सेवाकार्याची ज्योत प्रज्वलीत केली आहे. गरजूंना आधार देऊन समाजातील अंंधकार दूर करण्याचे काम ही ज्योत करणार आहे. लिनेसच्या माध्यमातून सर्व गरजू व आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम सुरु आहे. समाजकार्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी व गरजू घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य छोटे नसून, हे सामाजिक क्रांतीचे पाऊल आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या महिला सेवाभावांच्या ऋणानुबंधनात जोडले गेले आहे. कुटुंबापुरते मर्यादित न राहता, संकुचित विचार सोडून महिलांनी मोठे समाजकार्य उभे केले असल्याचेही पवार म्हणाल्या.


सुहासिनीताई कोयटे यांनी वंचितांच्या सेवेतच जीवनाचे खरे समाधान दडले आहे. सेवेतून जीवनात आनंद निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. डॉ. वर्षाताई झंवर यांनी या समाज कार्यात दहा हजार महिला जोडल्या गेलेल्या आहेत. या महिला विविध स्वरुपात सामाजिक योगदान देत असल्याचे सांगितले. अंजलीताई विसपुते यांनी महिलांनी सेवा कार्यात घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
कुमकुमजी वर्मा यांनी महिलांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. लताताई गोधडे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व उपस्थित महिलांना बेलाचे रोप दिले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मूकबधिर विद्यालयातील मुलांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. बालघर प्रकल्पातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. रणरागिनी क्लबने जिव्हेश्‍वर मंदिर मंडळाला खुर्च्यांसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.


वारकरी दिंडीची थीम घेऊन महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये लिनिसच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमा गिरधानी, जया भोकरे, भावना गवांदे, मायाताई कोल्हे, प्रांजल पवार, प्रसाद पवार, शोभा भालसिंग, मीरा बारस्कर, सोनल श्रीराम, सुरेखा कडूस, शर्मिला कदम, हिरा शहापुरे, आशा कांबळे, मीनाक्षी जाधव, निसर्ग पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, स्नेहल कौसल्ये, सुप्रिया देपोलकर, अर्चना जगताप, वृषाली लुटे, सुमन वाबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा भालसिंग व शर्मिला कदम यांनी केले. आभार सेक्रेटरी अमल ससे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *