साहित्य, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
साहित्य ही समाजाची आत्मा -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी भाषेची श्रीमंती, संस्कृतीची परंपरा आणि विचारांची समृद्ध परंपरा जपत मराठी साहित्य मंडळ (ठाणे) संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने 16 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केडगाव येथील स्व. शाहूराव देशमुख साहित्य नगरीत उत्साहात पार पडले.
या संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, जिल्हा अध्यक्ष त्र्यंबकराव (बाळासाहेब) देशमुख, तालुका अध्यक्ष नानासाहेब डोंगरे, मेधाताई काळे, प्राचार्य शिवाजीराव भोर, डॉ. ज्ञानदेव पांडुळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, संजय बंदिष्टी, स्वागताध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सुनील मामा कोतकर, मराठी साहित्य मंडळ संस्थेचे ललिता गावंडे, घनश्याम पांचाळ, राजेश थलकर, सुरेश लोहार, ॲड. कोळपकर, दशरथ यादव, विनायकराव जाधव, संजय यशवंत, लीना आढे, कोळपकर, डी. आर. बांगर आदींसह साहित्य मंडळाचे सदस्य व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, साहित्य ही समाजाची आत्मा असते. जेव्हा समाजाच्या भावना, वेदना आणि विचार शब्दरूप घेतात, तेव्हा तीच कविता, कथा आणि कादंबरी जन्म घेते. आजच्या युगात साहित्यिकांची जबाबदारी अधिक आहे . समाजाला सकारात्मक विचार देण्याची आणि संवेदनशीलतेचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी डॉ. मेस्त्री यांनी “पावसाची कथा आणि शेतकऱ्याची व्यथा” या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान दिले. ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी आणि निसर्गाशी असलेले आपले नाते यावर त्यांनी प्रभावी विचार मांडले.
दुपारच्या सत्रात झालेल्या काव्य संमेलनात सुमारे 35 कवींनी सहभाग घेतला. विविध विषयांवर हृदयस्पर्शी कविता सादर करण्यात आल्या. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या संमेलनात श्री बाळासाहेब देशमुख लिखित “आबा मास्तर” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. हे पुस्तक ग्रामीण शिक्षण, समाजातील परिवर्तन आणि शिक्षकांच्या भूमिकेवर आधारित आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव (बाळासाहेब) देशमुख, तालुका अध्यक्ष नानासाहेब डोंगरे, उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन धस, सचिव बबनराव खामकर, आशाताई काळे, सलीमभाई आतार, अनिता काळे, भिमराव घोडके, गीताराम नरोडे, सरोज आल्हाट, हरिश्चंद्र दळवी, संभाजी शितोळे, प्रकाश शितोळे, सिद्धेश्वर देशमुख, दत्ता डफल, अरुण सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रासकर व सौ. रेखा काळे यांनी केले. संमेलनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहालयाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे विशेष आभार मानण्यात आले.
संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने गौरव.
राज्यस्तरीय वैद्यक भूषण पुरस्कार- डॉ. हेमंतकुमार अकोलकर (राजापूर), डॉ. निर्मला दरेकर (अहिल्यानगर).
राज्यस्तरीय ग्रंथ भूषण पुरस्कार- तृप्ती आंब्रे (पिंपरी चिंचवड).
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार- लीना आढे (अहिल्यानगर), पै. नाना डोंगरे (अहिल्यानगर), सरोज आल्हाट (अहिल्यानगर).
राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार- अनिताताई काळे (अहिल्यानगर).
राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार- ओंकार कुचेकर, पुणे (सकारात्मक विचार, आनंदाची रोपटी), पद्मनाभ हिंगे, मांडवगण (शाल्मली), व्यंकट पाटील, ठाणे (कोब्रा).
