सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुनावणीत निर्णय होत नसल्याने कामगार संतप्त
अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयापुढे पगारवाढीच्या करारासाठी निदर्शने करण्यात आली. ट्रस्ट व युनियनची सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे चार ते पाच बैठका होवूनही निर्णय होत नसल्याने संतप्त कामगारांनी निदर्शने करुन 15 हजार रुपये वेतनवाढ करण्याची मागणी केली.
या आंदोलनात लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सुभाष शिंदे, प्रवीण भिंगारदिवे, संदीप शिंदे, देविदास ससाणे, हरिश पाटोळे, गजानन शेळके, अनिल फसले, राजू मोरे, बाबा कल्हापूरे, मारुती दहिफळे, विठ्ठल दहिफळे आदींसह कामगार सहभागी झाले होते.
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली आहे. युनियनच्या वतीने ट्रस्टशी नवीन करार होण्यासाठी डिमांड नोटीस देण्यात आली असून, कामगारांनी 15 हजार रुपये वेतनवाढ मिळण्याची मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. 2020 मध्ये झालेल्या करारात कामगारांना 4750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. गेल्या 20 वर्षापासून कामगार काम करत असून, सध्या कामगारांना 13 ते 15 हजार पगार आहे. या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने कामगारांनी पगारवाढीची मागणी केली आहे.
याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यापुढे नवीन करार होण्यासंदर्भात चर्चा झाली. चार ते पाच तारखा झाल्या, ट्रस्टचे पदाधिकारी व त्यांचे विधी सल्लागार विविध विषयांवर एकमत आहेत. मात्र देणगी मिळत नसल्याने पगारवाढ देता येत नसल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. मात्र 2020 साली झालेल्या करारात ट्रस्टने कामगारांना 4750 रुपयाची पगारवाढ दिली होती. या रकमेपेक्षा जास्त पगारवाढ देवून समोपचाराने तोडगा काढून महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी पगारवाढ देण्याची भूमिका युनियनच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, हा करार ट्रस्ट व संघटनेच्या समन्वयातून होणे अपेक्षित होता. मात्र ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देत नसल्याने प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे चालविण्यात आले आहे. अवतार मेहेरबाबा जिल्ह्यातील मोठी ट्रस्ट असून, त्यांची एवढी बिकट अवस्था नाही, की जे कामगारांना पगारवाढ देऊ शकत नाही. ट्रस्टने कामगारांच्या कुटुंबाचा विचार करुन व त्यांचा प्रपंच चालविण्या योग्य पगारवाढ द्यावी.
सतीश पवार म्हणाले की, महागाईच्या काळात कामगारांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कामगारांना 15 हजार रुपये पगारवाढची अपेक्षा आहे. वेतन वाढीवर सर्व कामगार ठाम असून, पगार वाढीसाठी चर्चा करुन तडजोडीने प्रश्न सोडवावा अन्यथा कामगार तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
