रविवारच्या सामन्यात मुलांमध्ये डॉन बॉस्को, रामराव आदिक व ओऍसीस विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि.29 सप्टेंबर) 16 वर्ष वयोगटात मुलांचे व 17 वर्षा आतील मुलींच्या गटाचे सामने रंगले होते. मुलांमध्ये डॉन बॉस्को, रामराव आदिक, ओऍसीस आणि मुलींमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंटने दोन संघांना नमवून विजयी घौडदौड सुरु ठेवली आहे. तर आठरे पाटील स्कूलच्या संघाने विजय मिळवला.

16 वर्ष वयोगटात डॉन बॉस्को विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 2-0 गोलने डॉन बॉस्को संघाने विजय मिळवला. यामध्ये दर्शन शेळके व वेदांत क्षत्रीय यांनी प्रत्येकी 1 गोल करुन विजय निश्चित केला. अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलला शेवट पर्यंत एकही गोल करता आला नाही.
ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द रामराव आदिक पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये यश भोये याने 2 व रवी गायकवाड याने 1 गोल करुन विजयाला गवसणी घातली. 0-3 गोलने रामराव आदिक पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.
कर्नल परब विरुध्द ओऍसीस स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात ओऍसीस कडून सार्थक देठे याने 2 गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. 0-2 ने ओऍसीस स्कूलचा संघ विजयी झाला.
17 वर्षा खालील मुलींच्या गटात ओऍसीस स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात रंगतदार सामना झाला. दोन्ही संघ विजयासाठी मैदानावर एकमेकांना भिडले होते. शेवटी ऑक्झिलियमची खेळाडू समृध्दी डोमकावळे गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. 0-1 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघ विजयी झाला.

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द ओऍसीस स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करुन एकामागोमाग 4 गोल केले. यामध्ये वेदिका ससे हिने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करुन 3 गोल केले. तर स्वरांजली शेळके हिने 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. 4-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.
कर्नल परब स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचा सामना देखील शेवट पर्यंत रंगतदार ठरला. यामध्ये ऑक्झिलियमची खेळाडू समृध्दी हिने 1 गोल करुन, 0-1 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघाला विजय मिळवून दिला.
ओऍसीस स्कूल विरुध्द कर्नल परब यांचात झालेला सामना शेवट पर्यंत रंगला होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये ओऍसीस कडून तनिष्का शेट्टी हिने 1 गोल व कर्नल परब कडून रिध्दी बोथरा हिने 1 गोल केल्याने हा सामना 1-1 गोलने बरोबरीत सुटला. तर ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द आठरे पाटील स्कूलचा सामना संध्याकाळी उशीरा पर्यंत सुरु होता.