पिडीत महिलेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंग करुन धमकाविणाऱ्या आरोपींकडून जीविताला धोका निर्माण झाला असताना सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रवरानगर (ता. राहता) येथील पिडीत महिलीने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणाला आरपीआय (गवई) च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक आघाडीचे दानिश शेख उपस्थित होते.
21 मे रोजी राहता पोलीस स्टेशन मध्ये विठ्ठल ढगे यांच्यासह इतर व्यक्तींविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरुन संबंधित व्यक्तीने घरी येवून जीवे मारण्याची धमकी दिली व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने 2 जून रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यामधील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
सदर आरोपी गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावित असून, जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांने माझ्यासह कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी तो कारस्थान करत असून, मी मुलाबरोबर एकटे राहत असल्याचा आरोपी फायदा घेत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करुन त्याला अटक करण्याची मागणी पिडीत महिलेने केली आहे.