पिडीत महिलेचा आत्मदहनाचा इशारा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरजातीय लग्न करून, सहा महिने चांगले नांदवून जातीवाचक शिवीगाळ करीत घरा बाहेर काढणाऱ्या व नातेवाईकाच्या अंत्यविधीत पुन्हा पिडीत महिलेला आणि तिच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीसह सासरच्या कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेल ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा वर्षा गणेश गुंड या पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भिंगारदिवे, भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब गायकवाड, मिलिंद आंग्रे, सुनीता गायकवाड, कुणाल गायकवाड आदी उपस्थित होते.
आंतरजातीय लग्न करून, सहा महिने चांगले नांदविण्यात आले. नंतर जातीवाचक शिवीगाळ करून घरातून काढून देण्यात आले. आई व भाऊ मोलमजुरीचे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले असता, सासरच्या 20 ते 15 लोकांनी मला व आई सुनिता गायकवाड हिला जबर मारहाण केली. यामध्ये आईच्या हातावर दांडका मारुन हात फॅक्चर करण्यात आला. तसेच आईच्या गळ्यातील गंठण तोडून घेण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तर त्यांच्या नातेवाईकाचे अवैध धंदे असल्याने, त्यांच्या ओळखीमुळे पारनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याबद्दल पती व सासरच्या लोकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा, आरोपींना साथ देणाऱ्या पोलीसांना सहआरोपी करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.