विविध गटात विजय संपादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.21 सप्टेंबर) झालेल्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व तक्षिला स्कूलचे संघ विजयी ठरले. आज झालेल्या सामन्यात 16 व 12 वर्ष वगोगटातील फुटबॉल सामने रंगले होते. या स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या संघांनी विविध गटात विजय मिळवून आघाडी घेतली असून, प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडवीत विजय संपादन केले.

16 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील पब्लिक स्कूलने दमदार खेळी करुन तब्बल 7 गोल केले. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करु न देता 7-0 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने विजय मिळवला. यामध्ये कृष्णा टेमकर याने 3, संग्राम गिते व नाथ राऊत यांनी प्रत्येकी 1 गोल तर भानुदास चांद याने 2 गोल केले.
आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द ओऍसीस स्कूल मध्ये रंगलेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूल कडून आयुष व गौरव याने प्रत्येकी 1 तर प्रज्वल व वैभव या खेळाडूने प्रत्येकी 2 गोल केले. 6-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूल संघाने दणदणीत विजय मिळवला.

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी दमदार खेळी केली. यामध्ये भानुदास चांद याने विक्रमी 6 गोल केले. तर कृष्णा टेमकर याने 3 व यश पानसंबळ याने 1 गोल करुन 10-0 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूल संघाने एकतर्फी विजय मिळवला.
12 वर्ष वयोगटात पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुध्द तक्षिला स्कूलचा रंगतदार सामना झाला. यामध्ये तक्षिला संघाकडून वेदांत व कल्पवीर याने प्रत्येकी 1 गोल करुन 0-2 गोलने पोदार इंटरनॅशनल स्कूलवर विजय मिळवला.
ओऍसीस स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी केली. या सामन्यात आठरे पाटील स्कूलचे खेळाडू समयंत म्हस्के याने एक गोल केला. तर ओम गलांडे याने आक्रमक खेळी करुन 3 गोल केले. यामध्ये 0-4 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.
