गीते यांनी दाखवलेले कर्तृत्व व धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गीते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल खंडेराव शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वडणे, संजय सावंत, रमेश शिंदे, अन्सार शेख, महिला पोलीस नाईक धनवडे, मनिषा काळे, रजनी ताठे, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे वाळुंबा नदीला आलेल्या पुरात सहाय्य पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मोठ्या धाडसाने पाच लोकांचे जीव वाचविले. ढगफुटी सदृश्य परिस्थितीने पुरात अडकलेल्या व्यक्तींसाठी गीते यांनी जीवाची बाजी लावून वाचविले. कर्तव्या पलीकडे जाऊन त्यांनी पूराच्या संकटात अडकलेल्यांना जीवदान दिले. त्यांनी दाखवलेले कर्तृत्व व धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.