• Wed. Nov 5th, 2025

स्वच्छता व अन्नसुरक्षा जनजागृती स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे यश

ByMirror

Aug 19, 2025

नाटिकेतून अन्नाचे महत्त्व विशद व अन्नाची नासाडी थांबविण्याचा संदेश

नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेची जागृती निर्माण करण्यासाठी हायजिन फर्स्ट आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धांमध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय स्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छता स्पर्धेत शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला, तर अन्नसुरक्षेवर आधारित आंतरशालेय नाट्यस्पर्धेत शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला.


स्पर्धेत शाळेने अन्नं पूर्णं ब्रह्मं, ही नाटिका सादर केली. या नाटिकेतून जीवनातील अन्नाचे महत्त्व, अन्नाची स्वच्छता, तसेच समाजातील विविध स्तरावर होणारी अन्नाची नासधूस यावर प्रभावी प्रकाश टाकण्यात आला. नाटकाद्वारे अन्नाची नासाडी थांबवा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या! असा जनजागृतीपर संदेश विद्यार्थ्यांनी संदेश दिला. या नाटिकेत साहिला कोकणे, गार्गी पुणतांबेकर, स्वरा बिडवे, रुद्र रसाळ, वर्धिनी गांधी, समृद्धी राऊत, सृष्टी डागवाले, रिधिमा लखारा, काव्या दीक्षित व मनाली देशपांडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नाटिकेसाठी विद्यार्थ्यांना आसिफ शेख यांनी मार्गदर्शन केले.


स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेला प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले, तसेच नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला हायजिन फर्स्ट व आय लव्ह नगरचे डॉ. रोहित गांधी व अनुराधा रेखी उपस्थित होते. यावेळी डॉ. गांधी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्वच्छतेचे महत्त्व व हायजिन फूड याबाबत मार्गदर्शन केले.


संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी यांनी शाळेला व विद्यार्थ्यांना या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *