यशस्वी होण्याचा दिला कानमंत्र
यशस्वी होण्यासाठी उद्याच्या दिवसाची तयारी आजच करावी -अशोक कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या केडगाव येथील जेएसएस गुरुकुलला उद्योजक तथा अशोका बिल्डिकॉनचे चेअरमन अशोक कटारिया यांनी भेट देवून शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कटारिया यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व मोठे स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठीचा कानमंत्र दिला.
शालेय विद्यार्थ्यांपुढे शून्यातून विश्व निर्माण केलेले एक आदर्श व्यक्तीमत्वाची भेट घडवून प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी सीए रविंद्र कटारिया, बांधकाम उद्योजक सचिन कटारिया, सुरेश कटारिया, गुरुकुलचे संचालक आनंद कटारिया, संचालिका निकिता कटारिया आदींसह शालेय शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक कटारिया म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी उद्याच्या दिवसाची तयारी आजच करावी. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे ठरते. पालक व शिक्षकांनी मुलांचे कला-गुण, चांगल्या-वाईट सवयी ओळखाव्या व चांगले कलागुण विकसित करण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्यावे. पारंपारिक शिक्षणापेक्षा क्वॉलिटी शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना सज्ज करणे तितकेच पालक शिक्षकांपुढे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी दोघांची भूमिका जबाबदारीची असल्याचे त्यांनी सांगितले.
तर विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीला महत्त्व देवून शैक्षणिक वाटचाल करावी. शाळेत शिकवला जाणारा धड आदल्या दिवशीच स्वत: अभ्यासावा. गुणवत्ता सर्वांमध्ये असून, त्या दिशेने प्रयत्न व परिश्रम घेण्याची गरज आहे. स्वतःचे करिअर घडविण्यासाठी स्वतःला सिध्द करण्याचे त्यांनी आवाहन केले.
संचालक आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता, त्यांना सक्षम नागरिक घडविण्याच्या दृष्टीकोनाने जेएसएस गुरुकुल कार्य करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला संस्कार व कौशल्य निर्माणाची जोड देऊन एकविसाव्या शतकातील विद्यार्थी घडविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम भंडारी व अयोध्या कापरे यांनी केले.
