मोक्का कारवाईची मागणी
स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिमसैनिक नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात रिपब्लिकन पक्ष (गवई) चे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संपदा म्हस्के, प्रतीक बारसे, विजय शिरसाठ, ज्योती पवार, निलेश शिरसाठ, प्रतीक शिरसाठ, शशिकांत गायकवाड, सोनू जाधव, तात्या शिरसाठ, भावड्या कुऱ्हाडे, विक्रम आंग्रे, राकेश आल्हाट, संतोष लोंढे, प्रवीण गायकवाड, सुजय पाटोळे, विशाल गायकवाड आदींसह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
या घटनेतील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचे अचूक लोकेशन वारंवार पोलिसांना देऊनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना राजकीय दबावातून वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, या प्रकरणातील तपासाबाबत पारदर्शकता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पुरावे पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. असे असतानाही दीड महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अटक न होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी आतापर्यंत नेमका काय तपास केला, किती पथके तयार करण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती फिर्यादीला तात्काळ द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास निर्भीड आणि सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
