मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पिडीत कुटुंबीयांना धोका
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव वडागळे, आशिष शेलार, नवनाथ शेलार, प्रेम गाडे, हिनाबाई उबाळे, सत्यजित शिंदे, बाबासाहेब शेलार, विजय वडागळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
नेवासा तालुक्यातील मौजे मुकिंदपुर येथील दिलीप सुखदेव सरोदे यांच्या हॉटेलवर सुरेंद्रसिंग बादल परदेशी यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपी हे दीड महिन्यांपासून बाहेर फिरत असून, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे सरोदे कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सदर आरोपीला तात्काळ अटक करावी व त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा सुनील उमाप यांनी दिला आहे.
