रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांचा युवक आघाडीच्या वतीने संविधानाची प्रत देऊन सत्कार
पक्षात पदाधिकारी म्हणून कार्य करताना ज्यांनी फक्त तडजोडी केल्या, त्यांनी चूकीचे आरोप करुन संभ्रम निर्माण करु नये -संजय भैलुमे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बुद्ध वंदनेने मेणबत्त्या प्रज्वलीत करण्यात आले. तर रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक शहराध्यक्ष निखिल अजय साळवे, माजी सरपंच युवराज पाखरे, सदाशिव भिंगारदिवे, सावेडी अध्यक्ष विनोद भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सूर्यवंशी, मिरजगाव शहराध्यक्ष नागेश घोडके, कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, महेश भिंगारदिवे, सुजित घंगाळे, विशाल ठोंबे, प्रकाश पवार, कृष्णा भिंगारदिवे, महादू भिंगारदिवे, प्रशांत चव्हाण, अक्षय गर्जे, प्रशांत पवार, राजू देठे, अतुल शिंदे, अतुल गवारे, विशाल गायकवाड, वसंत भिंगारदिवे, बिरजू जाधव, सूरज घुले आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरुन वाद निर्माण झालेला असताना, आजी-माजी जिल्हाध्यक्षांमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु आहे. जिल्हाध्यक्ष पदावरुन निर्माण झालेल्या वादावर नूतन जिल्हाध्यक्ष भैलुमे यांनी आपली भूमिका मांडून माजी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या 3 फेब्रुवारीच्या जिल्हा दौऱ्यात दूध का दूध, पाणी का पाणी होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. तर लवकरच जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे जाहीर केले.
पुढे भैलुमे म्हणाले की, जे पक्षाचे धोरण व घटनेच्या नावाने बोलतात त्यांनीच सांगावे की, पक्षाच्या घटनेप्रमाणे एखाद्याला 18 वर्षे जिल्हाध्यक्ष राहता येते का? त्या पदाधिकाऱ्यांनी पहिले पक्षाची घटना वाचावी व त्यानंतर अक्कल पाजण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाध्यक्ष पद हे फक्त मलिदा लाटण्यापुरते मर्यादीत नसून पक्ष वाढविण्याची देखील गरज होती. माजी जिल्हाध्यक्षांनी चूकीचे आरोप करुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करु नये.पक्षाची एक वेगळी व चांगली प्रतिमा असून, यापुढे चुकीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची व ना. आठवले यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करु दिले जाणार नाही. यासाठी कार्यकारिणीमध्ये निष्ठावान व चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांनी पक्षात पदाधिकारी म्हणून कार्य करताना फक्त तडजोडी केल्या. त्यांचे पद काढल्याने ते वरिष्ठ नेत्यांवर चूकीचे आरोप करत आहे. तडजोड ही पक्षाची परंपरा नाही. सर्वसामान्यांना न्याय देऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम यापुढे केले जाणार आहे. माजी जिल्हाध्यक्षांनी उठाठेव करु नये, अन्यथा त्यांच्या कार्यकाळातील 18 वर्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आपली लायकी तपासण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर माजी जिल्हाध्यक्ष यांची निवड सन 2022 मध्ये झालेली नाही, झाली असल्यास त्याला कोणाचे समर्थन होते? निवड कोणी जाहीर केली? निवडीचे पत्र आहे काय? यावर खुलासा करण्याचे आव्हान नूतन जिल्हाध्यक्ष भैलुमे यांनी दिले.
अमित काळे म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. माजी जिल्हाध्यक्षांनी घरी रहावे व नव्याला संधी मिळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. माजी जिल्हाध्यक्षाचा सुरु असलेला तमाशा हा पक्षासाठी हानीकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहर शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने संजय भैलुमे यांची रिपाईच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.