अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार एसटी कामगार चळवळीतील कार्यकर्ते शाहनवाज शहासाहब शेख (जहागीरदार) यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हा संघटक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांनी शाहनवाज शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
शाहनवाज शेख (जहागीरदार) मागील 30 वर्षापासून एसटी कामगार चळवळीत कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रीय एसटी कामगार संघटना इंटक व कास्ट्राईब एसटी कामगार युनियनच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी काम केले आहे. कामगारांच्या विविध प्रश्न व न्याय हक्कासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तर विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हा संघटक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेख यांनी या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे भ्रष्टाचारातून होणारे शोषण दूर करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे राज्य व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
