माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्कार
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे गणित शिक्षक संजयकुमार हरिश्चंद्र निक्रड यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीत निक्रड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे राज्य प्रकाशन समिती प्रमुख नवनाथ घुले, जिल्हा गणित मंडळाचे सल्लागार कल्याण ठोंबरे, जिल्हा मंडळाचे परीक्षा प्रमुख विष्णू मगर, जिल्हामंडळ सदस्य अविनाश बोंद्रे, प्रख्यात व्यावसायिक नंदेश शिंदे, तुषार चोरडिया आदींसह अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व अध्यापक उपस्थित होते.
राज्य गणित महामंडळाच्या 47 वर्षात नगर जिल्ह्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. राज्य महामंडळ हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. ही महाराष्ट्रातील गणित शिक्षकांची संघटना असून, ती प्राविण्य प्रज्ञा परीक्षा व त्या परीक्षा संबंधीची मार्गदर्शक पुस्तके महाराष्ट्रातील बहूसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात. संजयकुमार निक्रड यांच्या निवडीने जिल्ह्यातील सर्व गणित अध्यापकाची मान उंचावली असल्याची भावना नवनाथ घुले यांनी व्यक्त केली.
निक्रड यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्य महामंडळ सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास जिल्ह्यातील गणित अध्यापकांनी व्यक्त केला आहे. निक्रड हे सध्या नगर जिल्ह्याचे गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांना राज्य कमिटीवर अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे सल्लागार विलास आंबोळे, मच्छिंद्र वीर, जर्नाधन मुंडे, नाना लामखेडे, सिध्देश्वर मुंबरे, विठ्ठल शिंदे आदींसह जिल्ह्यातील गणित अध्यापकांनी अभिनंदन केले आहे.
