कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत नियुक्तीची घोषणा
संविधान विरोधी कार्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींना भाजप बळ देत आहे -किसन चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हनीफ जैनुद्दीन शेख (बंटीभाई) यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हस्ते शेख यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे, भाऊलाल शेळके, आबिद शेख, हेमंत पुरी, अमित मोर्या, अन्वर शेख, अहमद सय्यद, अली सय्यद, सलीम शेख, जमीर शेख, मुन्ना शेख, साहिल सय्यद, सादिक शेख, जावेद शेख, सैफुल सय्यद, शाहरुख शेख, शराफत सय्यद फिरोज शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किसन चव्हाण म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून संधी देण्यात येत आहे. संविधान विरोधी कार्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींना भाजप बळ देण्याचे काम करत आहे. संविधान टिकले तर विस्थापित व बहुजन समाजाला न्याय मिळणार आहे. मात्र भाजप सरकारने संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. हिंदू-मुस्लिम दंगली पेटविण्याचे प्रयत्न सुरू असून, या धर्मांध शक्तींना थोपविण्यासाठी फुले, शाहू,आझाद आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहे. या विचाराने सर्व जाती-धर्माचे बांधव त्यांच्या पाठिशी उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतीक बारसे म्हणाले की, वंचित व विस्थापित समाजाला एकत्र करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरु आहे. शहरात देखील धर्मांधतेला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असून, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कार्य सुरु आहे. शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित शहराध्यक्ष हनीफ (बंटीभाई) शेख यांनी सर्व समाजातील युवकांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शहरात एक मोठी ताकद निर्माण केली जाणार असल्याचे सांगितले.