शासन आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी
गुणवत्तेला महत्त्व प्राप्त होऊन लक्ष्मी दर्शनाला पायबंद होणार -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उच्चशिक्षण विभागात गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टलद्वारे प्राध्यापक व शिक्षकेतरांची नियुक्ती होण्यासाठी शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव व उच्च शिक्षण संचालक यांना निवेदन पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील उच्च शिक्षण विभागात रखडलेली 5500 प्राध्यापक व 2900 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देऊन मोकळा केला असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
मात्र प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी व लक्ष्मी दर्शनाला किंचितही वाव मिळू नये. या पवित्र हेतूने सदर नियुक्त पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा शासन निर्णय आदेश तात्काळ निर्गमित करण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी सुमारे 70 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात सुमारे 40 ते 50 लाख रुपयांपर्यंतचे लक्ष्मी दर्शन झाल्याची सर्वत्र चर्चा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घटकाची प्राध्यापक नियुक्ती सुमारे 70 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या लक्ष्मी दर्शनाने होत असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टयाबाबत चिंतन करणे व्यर्थ ठरेल. प्राध्यापक व कर्मचारी यांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारावरच करण्याच्या हेतूने पवित्र पोर्टल तयार करणे व त्या आधारावर नियुक्त्या करण्याचा आदेश निर्गमित करणे काळाची गरज आहे. यामुळे गुणवत्तेला महत्त्व प्राप्त होऊन गुणवत्तेचा सन्मान होणार आणि लक्ष्मी दर्शनाला पायबंद होणार असल्याचे म्हंटले आहे.
शालेय शिक्षण विभागात सन 2017 पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक नियुक्ती मधील लक्ष्मी दर्शन पूर्णपणे संपुष्टात आले नसेल, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनावर नियंत्रण आलेले आहे. गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांच्या नियुक्त करण्यात येत आहे. हा अनुभव विचारत घेऊन उच्च शिक्षण विभाग सुद्धा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय घेतल्यास गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळणार आहे. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)