मुलींची पहिली शाळा सुरु केल्याच्या सन्मानार्थ व फुले दांम्पत्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी निघणार रॅली
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा (जि. पुणे) येथे मुलींची पहिली शाळा सुरु केल्याच्या सन्मानार्थ माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने 1 जानेवारी रोजी भिडेवाडा ते फुलेवाडा महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी केले आहे.

माळी महासंघाच्या वतीने मागील 9 वर्षापासून या रॅलीचे आयोजन करण्यात येते. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव रॅलीत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. नियोजन बैठकीसाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, जिल्हा सचिव विवेक फुलसौंदर, अमर हजारे, तुषार बोरूडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने सर्व अडथळे दूर झाले आहेत. काही दिवसात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु होत असून, ही माळी महासंघाच्या पाठपुराव्याचे मोठे यश आहे. त्याचा जल्लोष व ओबीसींचे आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी ही रॅली निघणार आहे.
या रॅलीच्या माध्यमातून फुले दांम्पत्यांच्या महान कार्याला वंदन केले जाणार असल्याचे माळी महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश संयोजक संतोष लोंढे, प्रदेश मार्गदर्शक काळुराम गायकवाड, रॅलीचे संयोजक दीपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघणार आहे.