राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पटकाविल्याबद्दल सन्मान
शहरातील महिला खेळाडूने मिळवलेले यश कौतुकास्पद -ज्ञानेश्वर खुरंगे
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा मिश्रा या महिला खेळाडूने दिल्ली (रोहिणी) येथे झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइक्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी त्यांचा सत्कार केला.
दिल्ली रोहिणी येथील राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिश्रा यांनी 63 किलो वजनगटात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत मिश्रा यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची स्पेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी शहरातील एका महिला खेळाडूने मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. पॉवर लिफ्टिंगमध्ये महिला खेळाडू दुर्मिळ असून, या खेळात मिश्रा यांनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. तर खेळाडूंना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन देण्याचे कार्य जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट करुन मिश्रा यांना भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.