लंके यांचे उपोषण सर्वसामान्य जनतेच्या मनातील उद्रेक -रघुनाथ आंबेडकर
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरु आहे. या उपोषणात भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून उपोषणास पाठिंबा दिला.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी पाठिंब्याचे पत्र खासदार लंके यांना दिले. यावेळी अनंत गारदे, अशोक रोहोकले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, दीपक साळवे, अनिल पठारे, बाबासाहेब महापुरे, बाबासाहेब डोळस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रघुनाथ आंबेडकर यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराने जनता वैतागली आहे. सामान्य जनतेला हप्तेखोरीचा त्रास सहन करावा लागत असून, हे उपोषण सर्वसामान्य जनतेच्या मनातील उद्रेक आहे. या उपोषणामुळे पोलीस खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. लंके यांच्या या उपोषणाने सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास मदत होणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तर प्रामुख्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रकरणे दडपली जातात. सत्य प्रकरणे असतानाही दिशाहीन चौकशी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.