संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक युवकांचे संघटन उभे करण्याचा खान यांचा निर्धार
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंजर अन्वर खान यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम.आय.एम.) च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार व पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांच्या हस्ते ही घोषणा करण्यात आली.
इम्तियाज जलील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाउंटवरून अंजर अन्वर खान यांच्या नियुक्तीची माहिती देत अभिनंदन केले आहे. त्यांनी पुढील राजकीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत म्हटले की, अंजर अन्वर खान यांचे युवकांमध्ये चांगले संपर्क जाळे असून, त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षात अल्पसंख्यांक समाजातील युवकांचे संघटन अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्यांक समाजातील युवक-युवतींच्या प्रश्नांवर एम.आय.एम. सातत्याने आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी, शिक्षण, सामाजिक न्याय आणि राजकीय हक्क या विषयांवर युवकांचे प्रतिनिधित्व करणे हीच खरी जबाबदारी आहे. युवकांचे प्रश्न फक्त भाषणांत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून सोडवले जातील. आगामी काळात जिल्हा आणि राज्यभर युवकांचे एक सशक्त व प्रभावी संघटन उभे करण्याचे एम.आय.एम.च्या माध्यमातून ध्येय असल्याचे अंजर खान यांनी सांगितले.
लवकरच नगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये युवकांच्या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यांमधून युवकांना पक्षाशी जोडून त्यांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नियुक्तीनंतर अंजर अन्वर खान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.