• Wed. Oct 15th, 2025

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान

ByMirror

Dec 30, 2024

स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते -अनिता काळे

नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. काळे यांची दुबई येथे होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड व रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सर्व महिलांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
पांढरीपूल येथील आठवण हॉटेलच्या परिसरात हा सन्मान सोहळा रंगला होता. यावेळी प्रतिभा भिसे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सावेडी ग्रुपचे अध्यक्ष रजनी भंडारी, उपाध्यक्ष उषा सोनी, खजिनदार मेघना मुनोत, आशा गुंदेचा, सचिव रेखा फिरोदिया, जयश्री पुरोहित, शोभा भालसिंग, हेमा पडोळे, आरती थोरात, रेखा मैड, ज्योती गांधी, नीलिमा पवार, उषा सोनटक्के, अलका वाघ, अर्चना बोरूडे, संगिता घोडके, सुजाता कदम, सुनीता काळे, सुरेखा जंगम, लीला अग्रवाल, शकुंतला जाधव, शशिकला झरेकर, आशा गायकवाड आदी उपस्थित होत्या.


प्रतिभा भिसे म्हणाल्या की, महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्तकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अनिता काळे या सातसमुद्रापकीकडे जावून आपल्या मातीतला इतिहासाचा प्रचार-प्रसार करीत आहे. सातत्याने त्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर व्याख्यानातून महिलांमध्ये जिजाऊंचे संस्कार रुजवित आहेत. जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षिका म्हणून कार्य करताना मुलांना दर्जेदार शिक्षणासह संस्कार रुजविण्याचे कार्य त्या करत आहे. त्यांची झालेली निवड ही सर्व महिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.


अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, ग्रुपच्या उपाध्यक्षा असलेल्या अनिका काळे या अष्टपैलू व्यक्तीमत्व असून, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्या व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे कार्य करत आहे. अहिल्यादेवींच्या नावाने त्यांना मिळालेला पुरस्काराने ग्रुपच्या सर्व महिलांना आनंद झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सत्काराला उत्तर देताना अनिता काळे म्हणाल्या की, सर्व महिलांनी एकत्र केलेला गौरवपूर्ण सत्कार हा एका मोठ्या पुरस्काराप्रमाणे आहे. स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते. महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महिलांना संघटित करुन हे कार्य चालवले जात आहे. ग्रुपच्या माध्यमातून देखील सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रुपच्या वतीने करण्यात आलेला सत्कार हा भविष्यात आनखी कार्य करण्याची ऊर्जा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. आशा गुंदेचा या ज्येष्ठ महिलेच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा पडोळे यांनी केले. आभार आरती थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *