जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन; 60 रुग्णांची मोफत तपासणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील पंचवीस वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरत सुरू आहे. या सेवेत कार्य करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद होत असून सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटलने नागरिकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले असल्याचे प्रतिपादन भगवान महावीर भोजनालयाचे संचालक मिलापचंद पटवा यांनी केले. या सेवेत योगदान देताना त्यांचे डोळेही पाणावले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त मिलापचंद पटवा परिवाराच्या सहकार्याने आयोजित जनरल सर्जरी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रुपेश पटवा, अमित पटवा, लीलाबाई पटवा, नम्रता पटवा, निकिता पटवा, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, जनरल सर्जन डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मिलापचंद पटवा पुढे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचीही सोय व्हावी या उद्देशाने भगवान महावीर भोजनालयाच्या माध्यमातून अल्पदरात सात्विक व पोटभर जेवण दिले जाते. या भोजनालयाचा दररोज दीड ते दोन हजार नागरिक लाभ घेत आहेत. मागील 14 वर्षांपासून ही सेवा अखंडपणे सुरू असून सेवाभावाने केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण उपचार घेऊन बरा होऊन बाहेर पडतो, हीच सेवाकार्याची खरी समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना संतोष बोथरा यांनी सांगितले की, पटवा परिवार अत्यंत सेवाभावी असून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत. अल्प दरात दर्जेदार, स्वच्छ आणि घरगुती चव असलेले जेवण उपलब्ध करून देत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळतो. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा मोलाचा हातभार लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध 16 आरोग्य शिबिरांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. विवेक भापकर यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची 25 वर्षे पूर्ण होत असून ही सेवा दिवसेंदिवस विस्तारत आहे. वर्षभरात विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना उपचाराची संधी दिली जाते. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून अनेक तपासण्या 50 टक्के सवलतीत केल्या जातात. तसेच विविध शस्त्रक्रिया देखील अल्पदरात करण्यात येतात. सेवाभाव हीच या संस्थेची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जनरल सर्जरी शिबिरामध्ये 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांवर अपेंडिक्स, इन्ग्वायनल हर्निया, हायड्रोसिल यांसारख्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले तर आभार सुभाष मुनोत यांनी मानले.
दरम्यान, 8 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेषतः महिलांसाठी मॅमोग्राफीद्वारे स्तन कॅन्सर तपासणी केली जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त महिला व गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
